शिव जयंतीची संपूर्ण माहिती Shiv Jayanti Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Shiv Jayanti Information In Marathi छत्रपती शिवाजी महाराज की… असं म्हटलं की प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीच्या अंगावर शहरा उठून आपसूकच तोंडातून जय हा शब्द बाहेर पडतो. कोण होते शिवाजी महाराज?,  ज्यांनी मोघलांच्या जुलमी राजवटीविरुद्ध रणशिंग फुंकून त्यांना जेरीस आणले आणि सर्वसामान्यांचे स्वराज्य स्थापन केले ते म्हणजे शिवाजी महाराज होय, मर्यादा पुरुषोत्तम राम खुद्द ज्यांच्यामध्ये वसत होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या केवळ नावाने सुद्धा शत्रूला थरकाप भरायचा ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी भारतीय आरमाराची उभारणी केली ते म्हणजे शिवाजी महाराज.

शिव जयंतीची संपूर्ण माहिती Shiv Jayanti Information In Marathi

मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे काही सामान्य व्यक्ती नव्हते, आज साडेतीनशे वर्षानंतर देखील त्यांच्या पराक्रमाचा गोडवा महाराष्ट्रात टिकून आहे आणि आचंद्रसूर्य तो टिकून राहील. छत्रपती शिवराय यांचा जन्मदिवस शिवजयंती म्हणून महाराष्ट्रात मोठ्या भक्ती भावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्रीयन लोकांसाठी जणू तो एक सणच असतो.

आजच्या भागामध्ये आपण स्वराज्य संस्थापक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती बद्दल अर्थात शिवजयंती बद्दल माहिती बघणार आहोत…

सणाचे नावशिवजयंती
दिनांक प्रत्येक वर्षीच्या १९ फेब्रुवारीला
का साजरी करतात१९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवरायांचा शिवनेरी किल्यावर जन्म
झाला होता, त्यामुळे शिवजयंती हा सण साजरा केला जातो.
सुरुवात केव्हा झालीइसवीसन १८७० मध्ये
सुरुवात कोणी केलीमहात्मा ज्योतिबा फुले यांनी
सुरुवात कुठे झाली पुणे येथे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल माहिती:

यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, आपले उभे आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी वेचणाऱ्या या महान राजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांनी गनिमाविरुद्ध लढत आपल्या लोकांचे स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या जन्मदिवशी ही शिवजयंती साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाने शिवजयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केलेली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची गनिमी रणनीती, आणि प्रचंड बुद्धिमत्ता या जोरावर त्यांनी संपूर्ण दक्खन व दक्षिणेतील बऱ्याचशा भागावर आपले प्रभुत्व मिळवले. भारताला समुद्री मार्गाने येणाऱ्या लुटारूंची आणि आक्रमण करणाऱ्यांची देखील भीती आहे हे छत्रपती शिवरायांनी फारच पूर्वी ओळखले होते, आणि म्हणूनच त्यांनी सगळ्यात पहिले भारतीय नौदल किंवा आरमार स्थापन केले. या कार्यासाठी त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून गौरविण्यात येते.

शिवराय मुस्लिम विरोधी होते, असे बऱ्याच ठिकाणी वाचायला ऐकायला मिळते, मात्र शिवराय मुस्लिम विरोधी नसून वाईट प्रवृत्तीच्या सर्वच लोकांच्या विरोधात होते. त्यांनी मातृभूमीसाठी कार्य करणाऱ्या अनेक मुस्लिमांना देखील आपल्या सैन्यांमध्ये सहभागी करून घेतलेले होते.

इसवीसन १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर आपला राज्याभिषेक करून घेतला, आणि तेथून पुढे ते छत्रपती झाले. त्याचवेळी महाराजांनी समकालीन कालखंडात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या फारसी भाषा ऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी राज्यकारभार कोष हा ग्रंथ देखील लिहून घेतला, ज्यामध्ये फारसी भाषेतील शब्दांना पर्यायी शब्द देण्यात आलेले होते.

शिवजयंती बद्दल इतिहास:

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जरी १७ व्या शतकामध्ये झाला असला, तरी देखील त्यांची जयंती तेव्हापासून साजरी केली जात नव्हती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आणि समाजसुधारणा चळवळीतील अग्रगण्य असणारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली, आणि तेव्हापासून त्यांनी पुण्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली.

यानुसार महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७० मध्ये शिवरायांची पहिली शिवजयंती साजरी केल्याचे उल्लेख आढळतात. पुढे जहाल काँग्रेसवादी नेते बाळ गंगाधर टिळकांनी या शिवजयंतीची प्रथा परंपरा पुढे अबाधित चालू ठेवली. आणि तेव्हापासून शिवजयंती दरवर्षी न चुकता साजरी केली जाते.

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश राजवटीत विरोध करण्यासाठी अनेक संघटना स्थापन केल्या गेल्या होत्या, मात्र त्यांच्यामध्ये एकी आणि सुसूत्रता यांचा अभाव होता. या सर्व लोकांना एकत्र आणण्याचे काम या शिवजयंती उत्सवाने पार पाडले. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, त्यांचे संघटन कौशल्य, यांनी सर्व स्वातंत्र्यसैनिक प्रेरित होत आणि सर्व एकजुटीने लढत असत.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी केली जाते:

ज्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी सुरुवात केली, त्यावेळी शिवजयंती साजरी करण्याची पद्धत अतिशय साधी होती. जेणेकरून लोकांना स्फूर्ती आणि ऊर्जा मिळण्यास मदत होईल. जसजसा काळ बदलत गेला, तसे शिवजयंती साजरी करण्याची पद्धत बदलत गेली.

आज घडीला शिवजयंतीच्या दिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि मिरवणुकांचे आयोजन केले जाते. बऱ्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडे, लघुपट, नाटके इत्यादी गोष्टींचे सादरीकरण केले जाते. अनेक शिवव्याख्याते या दिवशी व्याख्यान देऊन जमलेल्या श्रोत्यांना शिवाजी महाराजांच्या जन्मा बद्दल माहिती देतात. महाराष्ट्रातील सर्वच लोकांसाठी शिवजयंती हा केवळ एक उत्सव नसून संपूर्ण वर्षभर पुरणारी ऊर्जा एकवटण्याचे साधन आहे.

शिवजयंतीच्या दिवशी सर्वत्र आनंदाचे वातावरण असते, सर्व शिवभक्त नटून थटून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. शिवजयंतीच्या दिवशी कुठेच कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचत नाही, यावरून शिवरायांचे विचार आजही समस्त शिवभक्तांमध्ये संचारत आहेत हे मात्र नक्की.

निष्कर्ष:

आज आपण शिवजयंती या सणाबद्दल माहिती पहिली. मित्रांनो ज्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामधून १८७० साली शिवजयंती उत्सव सुरू केला होता, त्यावेळी या उत्सवाचे स्वरूप हे वेगळे होते. दिवसंदिवस बदलत्या जीवनशैलीनुसार शिवजयंती उत्सवाचे स्वरूप बदलत चालले आहे.

पूर्वी पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा किंवा तसबीरीची मिरवणूक निघत असे. सर्व जाती धर्माची लोक या मिरवणुकीस सहभागी होत, आणि कुठलाही अनुचित प्रकार बघायला मिळत नसे. मात्र आजकाल शिवजयंती म्हटलं की शिवजयंतीला न शोभणारी गाणी मोठमोठ्या डीजे स्पीकर सिस्टम्स वर लावून वेडेवाकडे नाच केले जातात. हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे.

शिवजयंतीच्या दिवशी व्याख्याने, शिवरायांचे पोवाडे, तसेच शिवरायांवरील नाटक, सिनेमे, पथनाट्य, लघुनाट्य इत्यादींसारखे कार्यक्रम आणि अगदी शांततेत पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका निघाल्या पाहिजेत. ही माहिती वाचून प्रत्येक शिवभक्तांनी आपल्यात बदल करून घेतला तर शिवजयंती नक्कीच वाखणण्याजोगी साजरी केली जाईल, यात मात्र शंका नाही.

FAQ

शिवजयंती ही कोणाच्या जन्मदिनाच्या प्रित्यर्थ साजरी केली जाते?

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त शिवजयंती साजरी केली जाते.

शिवजयंती साजरी करण्यासाठी कोणी सुरुवात केली?

महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामधून शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली.

शिवजयंती हा उत्सव मोठ्या भक्ती भावाने कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

महाराष्ट्र या राज्यामध्ये शिवजयंतीचा उत्सव अगदी मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने साजरा केला जातो.

शिवजयंती वर्षाच्या कोणत्या दिवशी साजरी केली जाते?

इंग्रजी दिनदर्शिका नुसार शिवजयंतीचा उत्सव १९ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो.

शिवजयंती या दिवशी कोणत्या किल्ल्यावर भाविकांची मोठी गर्दी असते?

शिवजयंतीच्या उत्सवा दरम्यान ज्योत नेण्यासाठी शिवनेरी या किल्ल्यावर भाविकांची मोठी गर्दी असते.

आजच्या भागामध्ये आपण शिवजयंती या उत्सवाबद्दल माहिती पाहिली. आजचा हा भाग वाचून आपण शिवजयंती पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचं व्रत जरी घेतलं तरीदेखील ही छत्रपती शिवरायांना खरी श्रद्धांजली ठरेल. तर सर्वांनी कमेंट मध्ये डीजे गाण्याच्या धांगडधिंग्यात शिवजयंती साजरी न करता पारंपारिक पद्धतीने व्याख्यान, पोवाडे इत्यादींचे आयोजन करत शिवजयंती साजरी करण्याचे वचन घ्या, ही सर्वांना विनंती.

धन्यवाद…

Leave a Comment